रसिक प्रेक्षक हो !


© अमृता कुलकर्णी

शे-दोनशे-पाचशेच्या पंक्तीत ज्या वेळेस आपण बसलेलो असतो आणि त्याच वेळेस आपल्याला आणि आपल्या बरोबर त्या बसलेल्या प्रत्येकाला उद्देशून रंगमंचा वरून  " रसिक प्रेक्षक हो" ह्या शब्दाचा उच्चार  होतो  तेव्हा  अतिशय उत्कंठतेने , उत्साहाने  आपले  डोळे , कान आणि मन हे त्या एका  शब्दावर  केंद्रीत होतात.  रंगमंचावरून निवेदन करण्याऱ्या व्यक्तीसाठी आणि मागोमाग सादरीकरण करणाऱ्या कलाकारांसाठी आपण "रसिक" ही असतो आणि " प्रेक्षक" ही.  पण आपण रसिक आणि " प्रेक्षक" या दोन्हीही भूमिका रंगमंचावरील लोकांच्या जोडीने पार पाडतो का?

आता तुम्हाला हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे की " प्रेक्षक" हा काही लिहिण्याचा विषय असू शकतो का? यात काय लिहिण्यासारखं आहे? हे असेलही खरं .....पण एक वेगळा विचार मांडायला काय हरकत आहे ?

आता प्रेक्षक हा प्रेक्षकच असतो , जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी...त्याला भाषा, देश या सारखी बंधनं कधीच नसतात.. त्याला प्रेमाचं बंधन नसतं... स्वतः च मनोरंजन किंवा आपले आवडते कलाकार बघण्यासाठी आणि बऱ्याच वेळा अप्रतिम कलाकृती बघण्यासाठी तो कायम तत्पर असतो. त्यामुळे रसिक प्रेक्षक,कलाकार आणि कलाकृती  यांचे  एकमेकांशी  असलेले बॉण्ड  इतके घट्ट  असतात  कि या  गोष्टी एकमेकांशिवाय कायम अपूर्ण आहेत.

अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात मला माझी कला सादर करण्याची संधी  मिळाली. खरं तर  मला मिळालेली ही संधी १५-१६ वर्षांनी चालून आली होती ,त्यामुळे सुरवातीला मला बरंच दडपण आलं होतं पण नंतर मी स्वतः ला सावरत, त्या संधीच सोनं करण्याचाही प्रयत्न केला. हा कार्यक्रम सादर करतांना मला बऱ्याच गोष्टी खटकल्या तर काही गोष्टींबाबत माझा थोडा नाराजीचा सुर झाला पण या निमित्ताने थोडसं मनोगत तुमच्या जवळ मांडावं असं कुठेतरी मला वाटलं आणि म्हणून हा सगळा शब्द प्रपंच.

ज्या वेळेस तुम्ही एक कलाकार म्हणून उभे राहता, तेव्हा प्रेक्षक कसा असावा हे तुम्हाला योग्य पद्धतीने समजतं. कार्यक्रम कुठलाही असू दे त्या कार्यक्रमाचा आस्वाद योग्य पद्धतीने घेणं ही त्या सुजाण प्रेक्षकांची जवाबदारी असते.पण ही गोष्ट फक्त इतक्या पुरती मर्यादित न राहता आपण एक ठराविक प्रकारचे कार्यक्रम उचलून धरतो आणि नेमकी हीच गोष्ट कलाकार म्हणून त्याच्यावर बरीच अन्यायकारक होवू शकते.

या मध्ये दोन गोष्टी असतात, आपण कार्यक्रम बघायला नेमकं कुठल्या कारणासाठी आलोय आणि कार्यक्रम विनामूल्य आहे की समूल्य.आता पहिल्या गोष्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या वेळेस देशा बाहेरचा जो प्रेक्षक वर्ग असतो तो फक्त स्वतःच्या जवळच्या लोकांना प्रमोट करण्या साठी आणि फक्त त्यांना बघण्यासाठीच हजेरी लावतो आणि हा प्रेक्षक वर्ग शक्यतो विनामूल्य कार्यक्रमात उपस्थित असतो. इथे समूल्य कार्यक्रमांची संख्या मुळातच कमी असते, त्यामुळे जे इतर स्थानिक कलाकार रंगमंचावर आपापली कला सादर करत आहे ,त्याकडे बऱ्याच अंशी मूळ प्रेक्षक सरळसोट दुर्लक्ष करतो. या विरुद्ध चित्र भारतातल्या प्रेक्षकांच्या बाबतीत असतं. हा प्रेक्षक वर्ग बहुतांशी समूल्य कार्यक्रमांनाच हजेरी लावतो, कारण मुळातच विनामूल्य कार्यक्रम भारतात फार कमी प्रमाणात होतात.

भारताबाहेर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे इथे कुठलेही मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणं ही सोपी गोष्ट नाही.इथे मुळातच आपली संस्कृती, आपली मातृभाषा ही दुरावलेली असते. त्या मध्ये अथक प्रयत्नांतून उभ्या केलेल्या या कामाला एका मर्यादित दृष्टीकोनातून बघणं हे कुठे तरी अयोग्य आहे. मनोरंजन हे फक्त जवळच्या लोकांनी केलेलं कला प्रदर्शन नसून ,आपल्या भाषेपासून दुरावलेल्या लोकांनी त्यांच्या आकलानाप्रमाणे, मर्यादेप्रमाणे , आपल्या मातृभाषेत केलेलं सादरीकरण मग ते नाटक, नृत्य, संगीत कुठल्याही प्रकारचं असो ते इथल्या प्रेक्षकांनी नक्की स्वीकारलं पाहिजे.

प्रेक्षक कुठलाही असू दे, पण त्याची काही नैतिक कर्तव्यं आहेत. एखादी कलाकृती प्रेक्षक म्हणून तुम्हाला संपूर्णतः नावडू शकते आणि ती नाकारण्याचा तुम्हाला हक्क सुद्धा आहे पण त्या साठी ती कलाकृती पूर्णपणे पारखून घेण्याची जबाबदारी तुमची असते. पण कलाकृतीचा उपभोग घेताना काही शिष्टाचार पाळणे हे (स्व)बंधनकारक असतं.

कार्यक्रम बघतांना आपल्या बरोबर असलेल्या चिमुकल्यांमुळे बऱ्याच वेळा आवाज होतो , अर्थातच हे जरी आपल्या हातात नसलं तरी कलाकार आपली कला सादर करत आहेत आणि जे लोक त्या कलेचा आस्वाद घेत असतात त्या मध्ये या गोष्टी मुळे व्यत्यय येतो. लहान मुलांना आणणं ही अपरिहार्यता असली तरी त्या साठी योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे, की जेणे करून आपली स्वतःची एन्जॉयमेंट कुठेही बिघडायला नको. मोबाईल फोनची रिंगटोन  हा हि ह्यातल्या व्यत्ययाचा, आता जुना झालेला एक प्रकार . सार्वजनिक ठिकाणी  जिथे शांतता  पाळणं  आवश्यक  असतं (तेही प्रामुख्याने  कुठल्या हि नाट्य गृहात , कार्यक्रम सुरु  असलेल्या हॉल वर) मोबाईल फोन च्या  लाऊड रिंगटोन मुळे कलाकारांच्या concentration मधे disturbance येवून त्यांची बऱ्याच वेळा एकमेकांची  connectivity तुटण्याची भीती असते तिथे आपले सुजाण प्रेक्षक  बऱ्याचदा  आपल्या  फोनचा आवाज कमी ठेवायला विसरतात. आपला  फोन ‘सायलेंट’  ठेवायला हवा  हि गोष्ट समजायला  इतकी  अवघड  आहे का ?

पण जिथे कुठलंही  बंधन किंवा अपरिहार्यता नाहीये तो प्रेक्षकही जाणीवपूर्वक कलेचा आस्वाद घेतोच असं नाही. आपले चार परिचयाचे लोक भेटले की त्यांची विचारपूस आणि गप्पा मारण्याच्या नादात समोर सुरू असलेल्या कार्यक्रमाकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतं.त्यामुळे आवडीच्या कलाकारा व्यतिरिक्त इतर कलाकारांचं सादरीकरण कसं झालं याचा अभिप्राय त्यांना मिळतंच नाही. त्यामुळे साहजिकच इतर कलाकारांना प्रश्न पडतो की आपली कला लोकांना समजली की नाही की हा कार्यक्रम फक्त ‘प्रस्थापितांसाठीच’ होता का?

कलाकारांची अश्या प्रकारची उद्विग्नता केवळ प्रेक्षकांच्या अजाणतेपणा मुळे होते. ही फक्त उद्विग्नता नाहीये तर कलेचा ‌‌-हास होण्याचं केंद्रस्थान आहे आणि त्याचबरोबर होणारं कलाकारांचं मानसिक खच्चीकरणही आहे. (इथे कलाकार कोणीही असलं तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद जर negative असेल तरी ही उद्विग्नता साहजिकच आहे) कार्यक्रम समूल्य असूदेत नाहीतर विनामूल्य, प्रेक्षकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे या वरंही त्याचं success अवलंबून असतं. कलेचा  मानसन्मान  करणं  हे जितकं  कलाकाराला  बंधनकारक  आहे तितकंच प्रेक्षकांनांही आहे.कलेचा आस्वाद घेणं, तिच्या प्रती कृतज्ञ राहणं हे एका कलाकारा इतकंच प्रेक्षकांचंपण नैतिक कर्तव्य आहे. प्रेक्षकवर्गाची  शिस्त आणि  उत्तम कलाकृती या एकमेकांना नेहमीच पूरक असतात. या मध्ये कोणाचाही  असमतोल  हा  कलेसाठी नेहमी घातक असतो.

कलेच्या सादरीकरणात नवोदित अथवा नावाजलेले किंवा स्थानिक अथवा  प्रस्थापित यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत असते. ती असणं स्वाभाविक आहे परंतु कला ही कला असते , तिच्या साठी समान दृष्टिकोन ठेवणं प्रेक्षक म्हणून जास्त गरजेचं आहे. कलेचं सादरीकरण कोणीही केलं तरी त्यामध्ये प्रेक्षकांकडून दुजा भाव नको. प्रस्थापित अथवा नावाजलेले कलाकार तुमच्या मनोरंजनाची पूर्ण दखल घेतात आणि त्या प्रमाणात त्याचा परतावाही देतात. तुम्ही ज्या प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च केला आहे त्याची तुम्हाला योग्य पोहोच पावती मिळतेच ( १००% हे खरं आहे असं नाही, बऱ्याच वेळा नावाजलेल्या कलाकारांचा उथळ दृष्टिकोन अतिशय सुमार दर्जाचं कला प्रदर्शन करतो. प्रेक्षक म्हणून हा अनुभव नवीन नाही, प्रेक्षकांना गृहीत धरणं हा ही त्यांच्या सवयीचा भाग असतो.)

जरी ही गोष्ट प्रेक्षक आणि नावाजलेल्या कलाकारां मध्ये असली तरी नवोदित कलाकारांसाठी या गोष्टी खूप वेगळ्या असतात.

नवोदित कलाकार अतिशय मेहनतीने, सचोटीने,  प्रामाणिक पणे काम करतात.त्यांनी सादर केलेली कलाकृती ही  बऱ्याच वेळा  कमी साधनांमध्ये,कमी  उपलब्धते मध्ये, कमी खर्चात सादर केलेली असते.त्यांनी सादर केलेल्या कलेचा दर्जा हा सुमार किंवा उत्तम कुठल्याही प्रकारचा असला तरीही त्यांचा प्रयत्न प्रामाणिक असतो.त्यामधे कुठल्याही खोटेपणाची, अहंभावाची, पोकळ मोठेपणाची झालर नसते. अत्यंत निखळ पणे तो आपली कला सादर करतो.पण दुर्दैवाने अश्या कलाकारांकडे  प्रेक्षक वर्ग दुर्लक्ष करतो किंवा त्याच्या कलेला  नगण्य स्वरूपाचा प्रतिसाद देतो. त्यांच्या कलाकृतीत काही न काही कमतरता असते हे जरी मान्य केलं तरी त्यांच्या creativity ला, प्रामाणिकपणाला, मेहनतीला उचलून धरणं , त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळवून देणं  ही प्रेक्षक म्हणून आपली जवाबदारी नाही का?  नावाजलेल्या कलाकारांचा सुमार/उत्कृष्ट  अश्या कुठल्याही  प्रकारच्या प्रदर्शासाठी आपली जी वाट्टेल ती किंमत मोजायची तयारी असते ,त्याच किमतीचा काही भाग नवोदित कलाकारांच्या उत्कर्षा साठी मोजायला काय हरकत आहे?

जर हा सन्मान या नवोदितांना दिलाच नाही तर उद्या आपल्याच घरातून कलाकार जन्माला येताना हाच प्रश्न भेसावत राहील.

प्रेक्षक म्हणून आपली ही जवाबदारी भाषा आणि देश यांच्या पलिकडची आहे. भाषा कुठलीही असू दे, देश कुठलाही असू दे, किंवा देशांतर्गत  ही गोष्ट असू दे ही जवाबदारी , हा  दृष्टिकोन  सकारात्मक असणं हे सुजाण प्रेक्षकांचं  नैतिक कर्तव्य आहे.

कलाकृतीचा दर्जा हा  उत्तरोत्तर चांगला आणि उत्तमच व्हावा यासाठी स्वयंशिस्ती बरोबर एक उत्तम जाणकार ‘रसिक प्रेक्षक’ होण्याची आजच्या पिढीची आणि आजच्या वेळेची गरज आहे, स्वतःची हीच ओळख आपण हरवली तर सुमार आणि दर्जाहीन कलाकृतीच निर्माण होतील.

हि कुठलीही  अतिशयोक्ती  किंवा  आदर्शवाद  नाही,  फक्त हि आहे सुजाण प्रेक्षकाची तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांना  एक नम्र  विनंती.

Comments

  1. True.... In the same way established people should also see beyond cast/creed and allow them to portray themselves, and should not limit the opportunities to previledged few. May be you can take this as your next subject if at all you wish to.
    Rest the context, the opinion and the way it is presented is commendable.

    ReplyDelete
  2. खूप छान कलाकाराच्या मनातील व्यथा मांडली आहे अमृता

    ReplyDelete
  3. कलाकारांच्या प्रेक्षकांकडून असलेल्या माफक अपेक्षा छान मांडल्या आहेत. मुख्यत्वेकरून नवोदितांना जर खरोखरच प्रेक्षकांनी योग्य दाद दिली तर त्यांची जडणघडण नक्कीच चांगली होऊ शकते.

    ReplyDelete
  4. प्रेक्षक कसा असला पाहिजे ह्याबद्दलच्या अपेक्षा खूप उत्तम मांडल्या आहेत. पण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्याप्रमाणे प्रेक्षक तितके प्रतिसाद असतात. आणि म्हणूनच कलाकाराने फक्त आपली कला सादर करणं हेच आपल्या हातात आहे...

    ReplyDelete

Post a Comment