Disconnected Being Connected


© अमृता कुलकर्णी
माझ्या ब्लॉगचं टायटल वाचून सरप्राईज होऊं नका, पण मला आजकाल असं काहीसं  वाटायाला लागलंय "Disconnected being Connected". खरंतर आजकाल व्हाट्सअप आणि    फेसबुक वर फिरणारे मेसेज आणि आपल्याशी कनेक्टेड असणाऱ्या सो कॉल्ड आपल्या जवळचे लोक यांच्याबद्दल मला काहीतरी सांगावसं वाटतंय . ऍक्च्युली काही वर्षां पूर्वी आलेल्या या नवीन कन्सेप्टने मी खुप भारावून गेले . एकवेगळा विचार असलेल्या या अँपबद्दल खूप  कुतूहल होतं .एकमेकांच्या कनेक्ट मधे राहण्यासाठी या  अँपनी एकवेगळी ओपॉर्च्युनिटी  आणली . या निमित्ताने नजरेआड  गेलेले आपले शाळाकॉलेज मधले जुने मित्रमैत्रिणी, काही  नातेवाइक ,ऑफिस मधले कलिगज‌् अशा सगळ्यांचा  नव्याने शोध सुरू झाला. प्रत्येक जण हे  अँप डाउनलोड करण्यासाठी झपाटला होता .एकवेगळी  क्रेझ सुरू झाली   होती . अगदी  टीनेजर्स पासून    ते  घरातल्या  मोठयांपर्यंत  या अँपने वेडं करून सोडलं होतं.  ही गोष्ट एवढ्या पर्यंत न राहता ती एक "स्टेटस को" पण होती. टीनएजर   मध्ये  या ॲप च्या निमित्ताने ब्रांडेड फोन्स हाती आले होते तर   मोठ्यामध्ये एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी  चढाओढीचा प्रपंच चालू होता आणि  आजही  बऱ्याच  अंशी  तो  सुरू आहे .

 ग्लोबल कनेक्टिविटी , विडिओ कॉल, ऑडिओ कॉल, वेगवेगळ्या बिजनेस प्रमोशन्स, नवीन क्रिएटिव्हिटीज तेहीं सगळं विनामूल्य अशीसगळी  वेगवेगळी फीचर्स  या अँपने आणली आणि अल्पावधीतच ती  लोकप्रिय झाली. ॲप लॉन्च झाल्यापासून ते आजतागायत सातआठ वर्षानंतरही हे ॲप तेवढीच लोकप्रियता टिकवून आहे.

काळाच्या ओघात मैत्रीची व्याख्या बदलते,नात्यांची परिभाषा बदलते, कदाचित ती जास्त परिपक्व होते असे म्हणतात. पण आज कालची मैत्रीची भाषा आणि परिभाषा ही फारच वेगळी झालीये. मैत्रीमध्ये एकेकाळचा जो संवाद होता तो आज कुठेतरी हरवत चालला आहे असं मला वाटतंय. मैत्रीमधले एकमेकांबरोबर घालवण्याचे सुखद क्षण हळूहळू आपणच नकळतपणे कुठेतरी दूर ढकलून देतोय. आपला आनंद, आपलं दुःख ,आपलं यश, आपलं अपयश या सगळ्या गोष्टी ज्या आपण बोलून व्यक्त होतो त्या सगळ्या गोष्टी लिहून, कधी कधी फॉर्मॅलिटी म्हणून व्हाट्सअप वर व्यक्त होतो. एकीकडे आपल्याला वेळ नाही ,आपण बिझी आहोत या नावाखाली कितीतरी वेळ या सगळ्या गोष्टी ,कितीतरी गप्पा व्हाट्सअप वर आपण टाईप करत बसतो. पण दोन शब्द कॉल करून या सगळ्या गोष्टी आपण सांगू शकत नाही, हा एक विरोधाभास  नाही का ? बोलूनही एकमेकांशी तयार न होणारा कम्फर्ट झोन या व्हाट्सअप चॅट मध्ये मिळतो असं असंख्य लोकांना वाटत असेल आणि म्हणूनच की काय तो बोलण्याऐवजी लिहिण्याचा कम्फर्ट जास्त. पण जी गोष्ट प्रत्यक्षात भेटून एकमेकांना सांगण्यात जी मजा देईल, ती व्हाट्सअप वर लिहून खरंच आनंद देते का?

लाइफ फास्ट होत चाललंय,एकमेकांना एकमेकांकडे ही बघायला वेळ नाहीये,मग अशा वेळेस व्हाट्सअप वर एखादा मेसेज टाकणं "सोप्पं", नाही का ? असा तक्रारवजा सूर लावणारी मंडळीही आपल्या मध्ये सापडतात. अर्थात त्यांची ही सबब काही अयोग्य नाही, वेळेनुसार बरोबरच आहे. पण याचा अर्थ आपल्या "बिझी" शेड्युलमधून आपण कधीच वेळ काढायचा नाही, असा आहे का?

लग्नाची ,बारशाची, वेगवेगळ्या कार्यक्रमांची आमंत्रणं आजकाल आपण व्हाट्सअप मधूनच देण्याच्या फॉर्मलिटीज करतो, काळानुरूप हे अगदी बरोबर आहे पण हा ट्रेंड योग्य नाही. कुठेतरी पूर्वीच्या लोकांनी या नात्यांमध्ये टिकवलेला जो ओलावा होता,जी माया होती, या सगळ्या कार्याच्या निमित्ताने घरी जाऊन आमंत्रण देण्यात जी आपुलकी होती, ती आपण सोयीस्करपणे दडपून टाकतोय असं मला मनापासून वाटतंय. आपल्या नात्यांना,मैत्रीला सोयीस्करपणे आपल्या सोयीनुसार व्हाट्सअप पुरतंच मर्यादित ठेवून कुठेतरी एकलकोंडेपणा कडे आपणच आपली पावलं टाकतोय.
एकूणच काय व्हाट्सअप वर सगळं सांगितलं की आपली जबाबदारी संपली असा आज-काल सरळ सोट आपण निष्कर्ष काढलाय. आजकाल मनोरंजन आणि जगण्याची गंमत याच्यामध्ये फारसं अंतर राहिलं नाहीये किंवा या दोन गोष्टीमधल अंतर इतक कमी होत चाललंय की मनोरंजन म्हणजे जगणं आणि जगणं म्हणजे मनोरंजन असा आपला जगण्याचा अर्थ होत चाललाय. नाती जपण्यासाठीही सोशल मीडियाचा आधार घ्यावा या इतकी दुर्दैवाची गोष्ट नाही. 

पण अर्थात सगळंच चुकीचं आहे असंही नाही .  कधीही  न खुललेली   नाती  या निमित्ताने  खुलायला लागली. एकमेकांशी   व्यक्त  होण्याचा  एक  वेगळा प्लॅटफॉर्म या अँपमुळे   मिळाला . सरळसोट मार्गानं ज्या गोष्टी सांगता येत  नव्हत्या, ते  सांगण्याचा  एक मार्ग   मिळाला . पूर्वीकधीही न घडलेले संवाद आता सुरू झालेत. 

एकमेकांशी कनेक्ट रहावा आणि जपावा या एका संकल्पनेसाठी एकत्र आलेला हे फीचर आताआपल्याला बरंच लांब घेऊन आलंय. एकमेकांशी कनेक्ट होणे सोडा पण वेगवेगळे जोक्स, पोलिटिकल प्रमोशन्स,व्याख्याना सारख्या असणाऱ्या कथा किंवा तत्सम लेख हे मूळ संकल्पनेला पूर्णपणे डिस्कनेक्ट करतात. ज्या लोकांच्या क्रिएटिव्हिटी साठी किंवा बिजनेस प्रमोशन साठी या ॲपने जी निशुल्क सेवा दिली आहे त्यासाठी बरेचसे लोक आभारी असणार यात शंका नाही पण सातत्याने केलेला भडिमार हा कधीही अयोग्यच आणि त्या गोष्टीचं नाविन्य घालवण्यासाठी तेवढाच जबाबदार असतो असं मला वाटतं.

व्हाट्सअप वर एखाद्या ग्रुप मध्ये ज्यावेळेस एखादा मुद्दा किंवा एखादी गोष्ट मांडायची असते तेव्हा हे क्रिएटिव्हिटी फॅक्टर्स बोलण्याच्या मुद्द्याला मागे टाकतातआणि मग सांगणाऱ्याला प्रश्न पडतो आपण आपलं म्हणणं मांडावं की नाही मांडावं?आणि मग ग्रुपमध्ये राहूनच आपण एकाकी पडल्याचं फिलिंगही बऱ्याच जणांना येतं.ग्रुप सोडायची इच्छा नसते पण असूनही आपल्या गोष्टी सांगता येत नाही असं संमिश्र फिलींग बऱ्याच लोकांचं असतं .मग प्रश्न पडतो की खरच ज्या गोष्टीसाठी एकत्र यायचं ठरवलं होतं ती गोष्ट एकत्र येऊन मिळते का?जी एकत्र यायची ओढ एकमेकांना भेटायची, बघायची, एकमेकांचं काय चाललं आहे हे जाणून घ्यायची ,तेच जुने क्षण अनुभवायचे जी संधी एका नव्या फिचरने दिली आपण खरंच  ती एनकेश करतोय का?
नात्यांची परिभाषा ही सोशल मीडियावर व्यक्त होण्यापलीकडची आहे.एखाद्या फिचर चा उद्देश हा सगळ्यांना एकत्र आणायचा नक्कीच असू शकतो पण त्याचा  सोइ स्कर  वापर करणे आणि सोईनुसार नात्यांना सोशल करणे हे नक्कीच योग्य नाही.मैत्री आणि नाती टिकवण्यासाठी एकमेकांचा सहवास, प्रेम,आदर, सन्मान, त्यासाठी घेतलेले कष्ट त्यांना परिपक्वता देतात. "नात्यांची ही वीण ,मैत्रीचे धागे दोरे हे कुठल्याही शॉर्टकटने मिळवता येत नाही त्यासाठी खऱ्या अर्थाने जगावं लागतं". कुठलीही वेळेची सबब न देता या गोष्टी जपण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुढे जावं लागतं तेव्हा या गोष्टींना परिपूर्णता येते. दोन वेगळ्या संकल्पनांची सरमिसळ करून आपल्या आयुष्यात किंवा आपल्या हातात काहीच पडणार नाही हे नक्की,  जी मैत्री, जी नाती या नव्या  संकल्पनेने   बहरायला  लागलीयेत  तिला   virtual  चौकटीत  न  अडकवता  बहरू दिलं पाहिजे ....... तेव्हाच    एकमेकांबरोबर "Truly connected" राहता येईल.

Comments

  1. तंतोतंत , मुद्देसूद, आजच्या परिस्थितीला योग्य; अनुरूप, चपखल, मार्मिक असा लिहिलंय तू अमृता. माझ्या काय किंवा इतर कुणाच्या मनात हे चाल्लेलाच असता, तू शब्दरूप केलंस. खरंच मला कधी कधी प्रश्न पडतो कि टेकनॉलॉजि ने आपण जवळ येत आहोत कि दुर जात आहोत ?
    Congratulations on your first blog, keep writing.

    ReplyDelete
  2. Great. Sopya language mdhe motha thought mandla ahe.

    ReplyDelete
  3. अगदी खरं आहे पण हातात असलेल्या माध्यमांचा चपखल आणि योग्य ठिकाणीच वापर करण्याची शिस्त आपणच लावून घ्यायला हवी.
    अंगठ्यांची संख्या मोजून, मी किती लोकप्रिय आहे ना किती माणसं माझ्या बरोबर आहेत ही भ्रामकता आधी सोडून देता यायला हवी.
    सुंदर संकल्पना आणि सुंदर ब्लोग.

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर शब्दांकन केले आहे actully सगळ्यांच्या मनातलं छान शब्दात मांडले आहे सुरेख

    ReplyDelete

Post a Comment