बाप्पा माझ्या मनातला



© अमृता कुलकर्णी


गणपती उत्सव म्हणजे आनंदाने, उत्साहाने, मिळून मिसळून एकत्र पणे सगळ्यांनी केलेली गणेशाची आराधना. गणेश उत्सव हा माझ्या खूप जवळचा सण आहे आणि त्याचं कारण म्हणजे माझ्या घरी,नाशिकला  पूर्वापार चालत आलेला गणेश उत्सव, जिथे आमच्या घरी वाड्यात स्वयंभू गणेश मूर्ती आहे. बाप्पाचं वेड तसं मला अगदी लहानपणापासून. या दहा दिवसात एकंदरच मी खूप  भारावलेली असायचे. या दिवसातला एकूणच उत्साह,  आनंद, एक वेगळी ऊर्जा मला कायम भुरळ घालत आलीये.

आमचं  कुटुंब म्हणजे नाशिक मधल्या भर वस्तीतल्या भल्या मोठ्या वाड्यात राहणाऱ्या  सहा ते आठ भावांचा  गोतावळा. ह्या सगळी मंडळींनी  आमच्या सारख्या त्या वेळेस लहान असणाऱ्या पोरासोरांना घेवून साजरा केलेला हा उत्सव म्हणजे कुठल्याही पर्वणी पेक्षा कमी नव्हता. दिवाळीपेक्षाही  जास्त महत्त्व असणारा गणेश उत्सव आमच्या घरातला  सगळ्यात मोठा उत्सव होता. या दहा दिवसात विविधरंगी कार्यक्रम  आणि त्या निमित्ताने  एकत्र येवुन साजरा केलेला प्रत्येक दिवस आजही माझ्या विस्मृतीत गेला नाहीये. गणेश प्रतिष्ठापनेनंतर गणेश पुराणापासुन या  धामधूमीला सुरुवात व्हायची. गणपती उठतात आणि बसतात या सुट्टी व्यतिरिक्त मधल्या दिवसां मध्ये सगळी कामं उरकून  संध्याकाळी आरतीला आणि पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सगळे एकत्र जमायचे. मंत्रजागर ,सहत्रावर्तन, भजन, सुगम-संगीत, सत्यविनायक, लहान मुलांचे आणि घरातल्या मोठ्या लोकांचे कलागुण प्रदर्शन अश्या विविधरंगी कार्यक्रमांनी गणेश उत्सवाच्या  पहिल्या आठ दिवसात रंगत यायची आणि नवव्या दिवशी सगळ्यांनी एकत्र बसून एक सिनेमा बघायचा. या सगळ्या दिवसांमध्ये एक वेगळी जादू होती, एक वेगळी अनुभुती  होती, एक वेगळा रंग होता. मंत्रमुग्ध व्हावं असा प्रत्येक दिवस या दहा दिवसातला होता.

दहावा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी, बाप्पा त्याच्या घरी जाणार या कल्पनेनेच माझ्या डोळ्याला चार धारा लागायच्या.त्याची आरती  सुरू झाली की तो आता जाणार म्हणून माझ्या रडण्याची सुरुवात व्हायची ते अगदी गंगेवर तो डुबकी मारून, त्याची बोळवणी करून आम्ही जड पावलांनी घरी परत येईपर्यंत.
         
माझ्या लग्नानंतर माझ्या सासरी गणपती बसत नाही. घरातलं गणेश पूजनसुद्धा दुसऱ्या लोकांकडून गणेश मुर्ती घेवून करावं लागतं असं समजलं. नाक दाबून तोंडाने श्वास घ्यावा अशी काहीशी माझी अवस्था, हे समजल्या वर झाली. पहिलं वर्ष मोठ्या मुश्किलीने मी काढलं. पण माझ्या घरात गणपती बसत नाही या कल्पनेने मी अस्वस्थ  होत होते. माझं मन हळहळत होतं.माझा अद्वैत झाल्यावर कुणा  एका मैत्रिणी कडून समजलं  की तिच्या कडेही बाप्पा बसत नव्हता पण तरीही  ती घरी आणून बाप्पा बसवत  होती.आणि झालं , इथेच माझ्या घरात बाप्पाच्या आगमनाचं बीजारोपण झालं. एका  वर्षी असाच विचार डोक्यात आला की आई-बाबांकडून बाप्पा घ्यावा आणि त्याची प्रतिष्ठापना करावी.. आणि जे मनात आणलं ते झालंही तसंच.. एक एक गोष्टी डोक्यात येत होत्या  आणि त्या पूर्ण होत होत्या.

सगळं काही सुरळीत सुरू असताना ऑस्ट्रेलियात येण्याचा अनपेक्षित योग आला.अचानक आलेल्या संधिने मनात सगळ्याच  संमिश्र भावना होत्या पण सगळ्या मध्ये एकच प्रश्न घर करून होता तो  म्हणजे माझा बाप्पा इथे बसणार का? इंडिया मध्ये असताना जे ही काही बाप्पाचं सुरू झालं होतं ते सगळं आता थांबणार का?  कारण आमचं रहाणं किती दिवस आहे याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती पण बाप्पा इथेही माझ्या मदतीला धावून आला. अद्वैतच्या शाळेत नुकतीच ओळख झालेल्या आणि  मूळची पुण्याची असलेल्या एका मैत्रिणीने मला बाप्पा देवू केला तो आजतागायत.आणि आज ४ थं वर्ष आहे की माझ्या ऑस्ट्रेलियातील घरी  बाप्पा विराजमान झालाय.तरीही बाप्पा साठी काही तरी करायचं ही जाणीव मला स्वस्थ बसू देत नव्हती.माझ्या घरी बाप्पा पाहुणा  म्हणून येतो,१० दिवस मी जे ही काही करेल त्यात समाधान मानतो.जिथे जागा मिळेल तिथे विराजमान होती आणि परत जातो. २०२० तसं माझ्या साठी बऱ्याच अर्थाने वेगळं वर्ष , बाकी या वर्षाने काही दिलं नसलं तरीही माझ्या मनातल्या बाप्पा साठीच्या जाणिवेला पूर्णत्व दिलं. सुगम संगीत, सत्यविनायक,  सहत्रावर्तन आणि  शाळेतल्या मैत्रिणींनी पाठवलेली अथर्वशीर्ष आवर्तनं..माझ्या  ऑस्ट्रेलियातील घरी संपन्न झाली.आणि जणू काही माझा वाड्यातला बाप्पा हे सगळं होण्याची वाट बघत होता असा मला feel आला.

बाप्पा , आजही तुझ्या पुढे हे सगळं होत असणार, आणि होईल सुद्धा पण ४ पिढ्यांपेक्षा जास्त एकत्र नांदणाऱ्या देवांच्या घरात राहिलेल्या तुला आज नक्कीच एकटं वाटत असेल. त्या एकत्र राहणाऱ्या आजी आजोबा, काका काकू या सगळ्यांच्या आठवणीत तू रमत असशील. त्या सगळ्या पर्वाला miss करत असशील. आज तू माझ्या घरी,  म्हणजे माझ्या सासरी विराजमान झालाय पण तरीही तुझं देव  वाड्यातलं स्वरूप  माझ्या घरात स्थापन झालंय असंच मी समजते. पुन्हा एकदा नाशिकला , वाड्यात जल्लोषात गणेश उत्सव सुरू व्हावा आणि आमच्या नवीन पिढी कडून तुझी अशीच अविरत सेवा  सुरू व्हावी असा आशीर्वाद  तू  आम्हा सगळ्या देवांच्या नवीन पिढीला दे.. आणि  पुन्हा एकदा  आमच्या सेवेचा  आनंद घे....

 || गणपती बाप्पा मोरया || मंगल मूर्ती मोरया ||

#GaneshFestival #India #MangalMurtiMorya

Comments

  1. Khup chhan lihilaay. Nasik madhil ganesh utsav varnan sundar. Khup divsani tumcha blog vachun fresh zale

    ReplyDelete
  2. Mastach Amruta
    Khup Chan lihilayes
    Asach Bappacha ashirwad tuzya pathishi raho☺☺

    ReplyDelete

Post a Comment