अहंगंड ..... Superiority Complex


© अमृता कुलकर्णी

तुम्हाला न्यूनगंड माहीत आहेच. जी गोष्ट येत नाही किंवा जिच्या बद्दल मनात एक अनामिक भीती असते ती गोष्ट म्हणजे 'न्यूनगंड'..पण तुम्ही कधी 'अहंगंड' बद्दल ऐकलय का? .. कौतुक, वाहवा, प्रशंसा याचा अतिरेक किवा overdose झाला की जो होतो तो ...Superiority Complex म्हणजेच 'अहंगंड'.

आपण भारतीय बुद्धिमत्तेच्या बाबतीत नक्कीच चांगले आहोत. मी सरस म्हणणार नाही , कारण आशिया मध्ये आपल्या पेक्षा उत्तम बुद्धिमत्ता लाभलेले देश आहेत पण तरीही भारतीय लोक थोड्याफार फरकाने मागे आहेत त्याचं मूळ कारण मला वाटतं , ते त्यांना स्वतः बद्दल असलेला Superiority Complex... 

आज काल या 'कौतुकास्पद' शब्दांचा वापर करतांना मी खूप काळजी घेते. हे शब्द कोणासाठी, कधी, आणि केव्हा वापरायचे आहेत याचा जाणीवपूर्वक विचार करते, कारण मला असं वाटतं की आपण बऱ्याच वेळा मनापासून दिलेली ही दाद समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचतच नाही आणि ह्या मागचं कारण म्हणजे त्या व्यक्तीला असलेला अहंगंड. मला असं वाटतय की आजकाल आपल्या आयुष्यात जे ही काही बदल होत आहेत त्याला बऱ्याच अंशी सोशल मीडिया जबाबदार आहे.हे झालेले आणि होणारे बदल बहुतांशी negative आहेत. गोष्ट छोटी असू दे नाही तर मोठी पण ज्या ही वेळेस ती सोशल मीडयावरून येते त्या वेळेस तिचं स्वरूपचं बदलून जातं. 

आनंद हा वाटण्यासाठीच असतो, मिळवलेलं यश हे किती मोठं आहे हे जो पर्यंत दुसरा माणूस सांगत नाही तो पर्यंत समजत नाही. आपली किंवा मुलांची एखादी achievement आपण जेव्हा सोशल मीडिया वरून व्यक्त करतो आणि मग like, dislikes, comments चा पाउस पडतो. त्यात अनपेक्षित प्रतिक्रिया आल्या की सुरू होते ......स्वत:ला great दाखवण्याची धडपड, superiority complex चा खेळ. खरं तर सोशल मीडिया किंवा व्यक्तिगत आयुष्यात आपल्याला दाद देणारे, आपल्या आनंदात सहभागी होणारे , आपल्याला योग्य रस्ता दाखवणारे बोटावर मोजण्या इतकेच लोकं असतात , त्यांची संख्या हजार,पाचशे पर्यंत कधीच जात नाही. मग तरीही हा अहंगंड, का आणि कशासाठी? 

मला समजलेली यशाची व्याख्या म्हणजे आपण एखाद्या क्षेत्रात ते शिखर गाठण्यासाठी केलेलेया प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्या प्रयत्नाला मिळालेली वेळेची, नियतीची आणि सहकार्याची उत्तम साथ....यश हे कधीच permanent नसतं आणि ते असूही शकत नाही. हे यश टिकवण्यासाठीचे प्रयत्न सातत्याने करावे लागतात. हे जेंव्हा जमतं तेंव्हाच तुम्ही यश संपादन केला असं म्हणता येतं आणि त्याच वेळेस समाजात एक वेगळा अलौकिक मान मिळतो. म्हणुनच एकाच मिळालेल्या यशामध्ये हुरळून न जाता मिळालेल्या यशाचं सातत्य कसं राखता येईल याकडे सतर्क रहावं लागतं, तेव्हाच तुमच्या मधला Superiority Complex वरती डोकं काढत नाही. 

 यशाला तुम्ही कधी लहान - मोठ्या परिमाणात मापू शकत नाही,ते नगण्यही असू शकतं किंवा भरघोसही, पण बऱ्याचदा अनपेक्षित यशाची हलकिशी भुरळ जरी पडली तरी आपण इतके हुरळून जातो की पुढे असलेली शिखरं आपल्याला दिसेनाशी होतात, आणि मग आपण प्रयत्न करणंच सोडून देतो. हि भुरळ आपल्याला अहंगंडाच्या वाटेने घेऊन जाते आणि मग मनापासून आलेली दाद किंवा कौतुकाची थाप आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. 

याही पलीकडे अहंगंड आणखी ज्या गोष्टींमुळे वाढतो ती म्हणजे खोटी प्रशंसा, विनाकारण केलेली वाहवा, कौतुक किंवा काही लोकांमध्ये तो उपजतच असतो. आपल्या अवती भवती, professional life मध्ये आपण बरेच जण बघतो की जे या प्रकारात मोडतात. एकतर या लोकांना वास्तविकतेच भान नसतं, असलं तरी त्यांना मान्य करायचं नसतं, किंवा काही जण तर Superiority Complex च्या अत्युच्च शिखरावर असतात की त्यांना बाहेर दुसर जग आहे याची जाणीवच नसते, यामागे वेगळी कारणं असू शकतात. ही माणसं आयुष्या मधली वास्तविकता कधीच स्वीकारत नाहीत. आपल्याला माहीत असलेली गोष्टच खरी आहे आणि तीच जगमान्य आहे किवा आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट योग्यच असते या मानसिकते मधून बाहेर पडायची त्यांची कधीच इच्छा नसते किंवा त्यांचा प्रचंड विरोध असतो..स्वतः मध्ये अतिशय गुरफटलेली अशी या लोकांची ख्याती असते. अश्या प्रकारच्या लोकांमुळे त्यांच्या आसपास , त्यांच्या professional life मध्ये एक प्रकारची negativity तयार होते. बऱ्याच वेळा त्यांच्या अशा वागण्याचा किंवा असण्याचा त्यांच्या आसपासच्या लोकांना खूप त्रास होतो, त्यांना वेगळ्या मानसिक तणावातून जावं लागत. काही वेळेला severe depression लाही सामोरं जावं लागतं. अर्थातच हे सगळच stressful असतं.मग कुठेतरी या लोकांपासून दूर पळणे, त्यांना टाळणे , त्यांच्याशी restricted communication ठेवणे असे प्रकार सुरू होतात. सायकॉलॉजी चा वेगळ्या अंकांत मला तुम्हाला घेवून जायचं नाहीये.पण अश्या प्रकारची negativity कधीही नकोच असते.

मला नेहमी अस वाटत आलंय की यशामुळे येणारा, स्वभावात मुळातच असणारा आणि वास्तविकता नाकारणारा अहंगंड.... Superiority Complex हा कायम एक imbalance create करतो. तुमच्या मध्ये आणि तुमच्या आसपास असलेल्या सगळ्या लोकांमध्ये एक प्रकारचं अंतर निर्माण करतो. स्वतःला समाजापासून कुठेतरी दूर ढकलायला सुरुवात करतो. यशाचा आनंद मर्यादित असतो.. मग एका मर्यादित आनंदासाठी आपण हा तुटकपणा का स्वीकारायचा? आपल्याला मिळालेलं यश, अंगीभूत असलेलं कौशल्य, असलेली बुद्धिमत्ता ही किती उच्च प्रतीची आहे किंवा तिची किंमत कीती आहे हे आपल्याला वेळ सांगते. त्यासाठी आपण स्वतः Superiority Complex बाळगण्याची आणि त्याची किंमत जगाला सांगायची गरज नसते. गरज असते ती, तुमची योग्य वेळ येवू देण्याची. ती येण्यासाठी वाट बघण्याची....कारण एकदा का ती वेळ आली की ती तिचं काम १००% करते.

वाईट गोष्टी आपण घेवूनच आलेलो असतो, चांगल्या गोष्टी अंगीभूत करण्यासाठी आयुष्यात कायम झिजावं लागतं. हा चांगुलपणा जपण्यासाठी धीर आणि संयमाची खरी गरज असते. धीर हा गुण तुमचा उतावीळ पणा कमी करतों तर संयम तुमच्यातला अहम कमी करतो. मग चांगला माणूस होण्यासाठी वेळेची ही किंमत मोजायला काय हरकत आहे?

#Positivity #Negativity #Strength #Weakness #Complex #lifelessons

Comments

  1. Touched many important things keeping superiority complex in centre.

    ReplyDelete
  2. आयुष्यात खूपच आणि नेहमीच काहीतरी शिकवण देणारा लेख

    ReplyDelete

Post a Comment